कृषी क्षेत्राकडे अधिक जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे- डॉ. बुधाजीराव मुळीक

नागपूर : कृषी क्षेत्राकडे अधिक जाणिवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून शेतीवर लक्ष दिले तरच आपला देश खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.

महाराष्ट्र विधानमंडळातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत विधानभवन येथे ‘महाराष्ट्रातील कृषी व सिंचन प्रगती : उद्दिष्टे आणि आव्हाने’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. मुळीक म्हणाले की, शेती क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे. अमेरिका, इस्त्राईल, ब्राझिल यासारख्या काही देशात शेतकऱ्याला मिळणाऱ्या उत्पन्नाची शाश्वती असते. तिथे विविध प्रकारच्या विमा, पुनर्विमा योजनांच्या संरक्षणाबरोबरच शेतकऱ्याच्या उत्पादनाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे शेती उत्पादनाला कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तरी तिथे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. भारतातही अशाच प्रकारे शेतीला कायद्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे.

देशात पूर्ण वेळ शेतकरी व अर्धवेळ शेतकरी अशी वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीविषयक विविध योजना पूर्णवेळ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे शक्य होऊ शकेल. भूकबळी, कुपोषण, बेरोजगारी, प्रदूषण या सर्व समस्यांवर प्रभावी शेती हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यास अशा विविध समस्या संपुष्टात येऊ शकतील, असेही ते म्हणाले.

दुष्काळासाठी कायद्यामध्ये टंचाई असा शब्द वापरण्यात आला आहे. त्याऐवजी दुष्काळ हा शब्द वापरल्यास केंद्राची मदत मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. हरितगृहांना सध्या व्यावसायिक कर्ज दिले जाते. त्याऐवजी त्यांना शेतीकर्ज देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात प्रभावी सिंचन निर्माण करण्यासाठी साधारण एक लाख कोटी रुपये लागू शकतील. शासनाने कर्ज किंवा इतर माध्यमातून हा निधी उभा करुन राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे, असेही डॅा. मुळीक यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...