डॉ. आंबेडकर जयंतीची नवे मॉडेल आणि नवे प्रयोग !

DR .Babasaheb Ambedkar

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – मार्च महिना सुरू झाला की, प्रज्ञापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे वेध लागायला सुरूवात होते. अलीकडे १४ एप्रिल बरोबर सर्वांना ११ एप्रिल या महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीचीही आस लागते आहे, हे फ़ार चांगले लक्षण आहे. सामाजिक समतेच्या या लढवय्यांचे योगदान युगकर्तेपणाचे आहे हे कोणी नाकारू शकत नाही. सयाजीराव गायकवाड महाराज आणि राजर्षि शाहू महाराज या कडवट समता कृतिवंतांना कसे विसरता येईल ? सत्ता कशासाठी असते आणि ती कुणासाठी वापरावी याचा आदर्श हे राजे होते. आजचे व कालचे राज्यकर्ते यांनी या दोघांपासून काहीच बोध घेऊ नये हे संतापजनक आहे. ते दोघेही राजे सेवाधर्मी होते आणि आजचे राजकारणी “महापुरुष” सत्ताधर्मी आहेत हाच तो एक ठसठशीत फरक !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती वर्ष २०१६ ला साजरी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या अवघ्या २४/२५ वर्षी भारतीय जातिव्यवस्थेची परखड व समाजशास्त्रीय चिकित्सा करणारा शोधनिबंध लिहिला , त्यालाही १०० वर्षें २०१६ ला झाली. परंतु उत्सवप्रिय समाज व सरकारला यावर फारशी वैचारिक चर्चा घडवून आणावी वाटली नाही हे प्रबुध्द समाजाचे लक्षण कसे मानावे? ज्ञानतपस्वी व ज्ञानधर्मी डॉ. आंबेडकरांची जयंती ही मिरवणूका, धांगडधिंगा व मद्यधुंद नि नृत्यधुंद तरूणाईने साजरी करावी हे शोभते का? “सुरामेरमज्जप्रमादठाना वेरमणी ” ही वंदना फक्त म्हणण्यासाठी की कृतीसाठी ? की हे अर्थहीन आहे. भटजीनजसे न समजणारे तथाकथित मंत्र म्हणता तसेच हे सारे बनत चालल्या का? प्रत्यक्ष जीवनाशी या मूल्यांचे काहीच नाते नाही काय ? एका मंत्राच्या जागी दुसरा मंत्र आले एवढाच फरक डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत होता काय ? त्यांना तर सांस्कृतिक परिवर्तन अपेक्षित होते . त्या दिशेने वाटचाल होतोय का ? यावर विचार , चिंतन नि सुयोग्य कृती करायची गरज वाटते आहे. मिरवणूका जरूर काढाव्या , आनंद व्यक्त करण्याचे ते माध्यम आहे, पण त्यात डॉ. आंबेडकरांच्या विचारांची सर्व समाजाला द्यायची अशी प्रबोधनाची शिदोरी असावी. ती सर्व भारतीय समाजाला नवी दिशा देणारी असावी.

जयंती मिरवणूकांना एक ज्ञानमय व शांततामय जयंती मिरवणूक करता येईल ना? पारंपारिकतेला छेद देण्याचा मार्ग व परिवर्तनाची नवी वाट धरणारी प्रबोधक अशी व शांतीचा संदेश देणारी जयंती मिरवणूक आपण का नाही करू शकत ? १४ तास , १८ तास , २४ तास अभ्यास करण्याचा असाच एक उत्तम उपक्रम. हटके वाटणारा नि बाबासाहेबांच्या अध्यनशीलतेचा वस्तुपाठ देणारा हा उपक्रम होय . असे अभिनव जयंतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम करायला हवेत. डॉ. आंबेडकर यांनी भारतीय समाजाला नवी दिशा दिली. आपण त्यांच्या जयंतीला त्यांच्या विचारांनी अनुरूप नवी दिशा नक्की देऊ शकू. आपल्याकडे तेवढे बुध्दिवंत व कलावंत जरूर आहेत. डॉ. आंबेडकर , म. फुले , सावित्रीबाई फुले , राजर्षि शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड महाराजांची जयंती नवविचारांची कास धरणारी व समाजाला वैज्ञानिक दृष्टी देणारी व सुसंस्कृत करू पाहणारीही जयंती असावी. ही अपेक्षा करणे चूक आहे का ? समाजाचा साचेबंदपणा मोडण्याचे कार्य करणारे बाबासाहेब, त्यांची जयंती पारंपारिक प्रथा मोडणारी नको काय? जरूर विचार करा नि नवा जयंतीप्रयोग आपआपल्या स्तरावर करावा. ती बाबासाहेबांना खरीखुरी आदरांजली ठरेल.

माझा अभिनव प्रयोग
बोलणे सोपे आहे पण करणे अवघड आहे , हे खरेच. म्हणूनच मी एक प्रयोग केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनेक उत्सवी कार्यक्रम झाले. यापेक्षा नवं काही करण्याचा मी प्रयत्न केला. डॉ. आंबेडकर म्हणजे ज्ञान – ज्ञानतपस्वीवृत्ती! या थोर प्रज्ञापुरूषाला ज्ञानात्मक आदरांजली वाहण्याचा मी विचार केला व एक नवकल्पना मनात आली. बाबासाहेबांच्या विविधांगी ज्ञानपैलूंच्यावरील १२ ग्रंथ १२५ व्या जयंती वर्षानिमित्त करण्याचा मानस केला. त्यातही विचार केला की , काही पायंडे मोडायचे . डॉ. आंबेडकर खरे तर संपूर्ण देशाचे भूषण मग त्यांच्यावर लेखन बहुधा दलित-बौध्दांनीच का करावं? इतरांची ती ज्ञानात्मक जबाबदारी नव्हे काय ? बाबासाहेब आंबेडकरांवर लेखन बहुधा दलितांनीच करायचं, दलितांनीच वाचायचं , त्यांच्यावर फक्त बहुधा ( मोजके अपवाद सोडून) दलितांनीच बोलायचं व बहुधा दलितांनीच ऐकायचं. बाबासाहेब सर्वांचे आहेत . इतर समाजानं हे का नाही करू ? त्यांचेवर अभ्यास असणारी सर्व समाजातील माणसे आहेत ( कमी असली तरी आहेत हे महत्वाचे) , त्यांना लिहितं करू . समाजाच्या सर्व थरातील लेखकांना लेखन करण्यास सांगू.

१२ पैकी निम्मी पुस्तके ग्रंथमालिका संकल्पन व संपादक या नात्याने मी इतर समाजातील अभ्यासक लेखकांकडून घेतली. दलित आंदोलनातील लेखक जोडीला होतेच . समाजाच्या सर्व थरातील लोक बाबासाहेबांवर लिहिताहेत असा एक ठोस प्रयत्न केला . ( या आधी अनेक मान्यवरांनी असे प्रयत्न केले आहेत, नाही असे नाही) . माझा हा खारीचा वाटा एवढेच. मग डॉ. आंबेडकरांच्या समाजाला माहिती नसणारे काही अस्पर्शित पैलूंवर भर दिला. त्या बारा ग्रंथात “शिक्षणतज्ज्ञ डॉ . बाबासाहेब आंबेडकर ( लेखक : अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. यू.म.पठाण) , नव संस्कृतीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( लेखक: समीक्षक व कवी प्रा. डॉ. यशवंत मनोहर ) , समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( लेखक : आंबेडकर स्टडीजचे संचालक प्रा. डॉ. प्रदीप आगलावे) , राष्ट्रभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( राज्यशास्त्राचे अभ्यासक व आंबेडकरी राजकारणाचे संशोधक प्रा.डॉ. भूषणकुमार जोरगुलवार ) , राज्यशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (लेखक व राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राचार्य डॉ. विठ्ठलराव एरंडे ) , अर्थतज्ज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( लेखक: मिलींद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. इंद्रजित आल्टे) , संरक्षकतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (लेखक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संरक्षणशास्त्र विषयाचे विभागप्रमुख व इंटरनँशनल सेंटरचे डायरेक्टर प्रा. डॉ. विजय खरे ) , दलित व राष्ट्रहितकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( लेखक : डॉ.ज्ञानराज गायकवाड राजवंश) , विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संशोधक डॉ. विजयकुमार पोटे) , जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( डॉ. दत्तात्रेय गायकवाड) , अंतर्गत सुरक्षातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( संरक्षक तज्ज्ञ प्रा. डॉ. विजय खरे ) , प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( सत्यशोधक आंदोलनाचे अभ्यासक डॉ. संभाजी ख़राट) या १२ पुस्तकांचा समावेश आहे.

एकूण २५०० पानांची ही ग्रंथमालिका १२५ व्या जयंती वर्षात मी व माझे सहकारी डॉ.संजीव सावले व डॉ. डी.एम.भोसले , प्रा. पराग हसे डॉ. बाल बोटे-पाटील , प्रा. डॉ. बालासाहेब पवार यांच्या सहयोगाने आणि आमचे मार्गदर्शक बेंगलोरच्या गार्डन सिटी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. जोसेफ़, डॉ. रमेश भापकर , आर.के. गायकवाड , अंबादासराव मानकापे , डॉ. रावसाहेब क़सबे , डॉ. प्रदीप आगलावे यांच्या कृतिशील पाठबलाने प्रज्ञापुरूषाला ज्ञानांजली वाहू शकलो. सरकार व संस्था यांच्याकडून एक रूपयाही न घेता , कुणाचीही देणगी न घेता हा मोठा स्वाभिमानी प्रकल्प पूर्ण करता आला . त्यासाठी ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मीशन प्रकाशन ” तयार केले. लेखकांना सन्मानजनक मानधन दिले. ग्रंथमुद्रण प्रिंटवेल इंटरनँशनल या मुद्रण संस्थेने अतिशय दर्जेदार व मोहरेदार केलेय . यास वाचकांचा प्रतिसाद चांगला लाभतोय . अजून प्रतिसाद अपेक्षित आहे.

आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या मित्रापरिवारास ही ज्ञानात्मक भेंट जरूर देऊ शकाल. एक अभिनव ज्ञानांजली ज्ञानी लेखकांच्या योगदानानं पूर्ण करू शकलो याचा सार्थ अभिमान आहे . डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञानात्मक योगदानाचे हे ज्ञानदर्शन वाचकांना भावतंय याहून अधिक काय हवय? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ज्ञानकार्याचा अभ्यास आंबेडकरप्रेमीं तसेच डॉ. आंबेडकर यांना समजून घेऊ इच्छिणारी इतर माणसे व समाज करतील अशी मला खात्री आहे. सर्व जातीधर्मातील नागरिकांनी आंबेडकर समजून घ्यायला हवेत.
डॉ. आंबेडकर हे मार्टिन ल्युथर किंग , नेल्सन मंडेला यांच्या तोड़ीचे महापुरूष होते. ते महात्मा गांधींच्या तोड़ीस तोड़ नव्हे तर काकणभर ज्यास्त मोठे समाजसेवी व राष्ट्रसेवक होते . म. गांधीनी परकीय इंग्रजांच्या गुलामीविरूध्द शांततामय लढ़ा दिला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पिढ्यानपिढ्याच्या स्वकीयांच्या अतिकठीण सामाजिक गुलामीविरूध्द शांततामय लढ़ा दिला आणि नवभारताच्या निर्मितीचे व स्वातंत्र्य , समता आणि बंधुतेच्या लोकशाही मार्गाचे आदर्श स्वप्न दिलं. दलितेतरांनी ते समजून घ्यायला हवे तर दलितांनीही आधी स्वत: वाचून समजून त्यांचे विचार सर्व समाज वर्गात कसे जातील हे कार्य हाती घ्यायला हवे.

जात जपणारे तर जातींचे संगोपन करताहेत पण जात मोडायला निघालेलेही जात जपताहेत- 

राष्ट्रभूषण डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाचा गाभा माणूसकीचे मंत्र गाणारा आहे. स्री -पुरूष भेद , विषारी जातीयवादाचा अंत करणारा आहे. कुणाचाही द्वेष न करणारी मानवतामय सभ्य संस्कृती निर्माण करणारा आहे. जातीपातीपलीकडे पाहण्याची वृत्ती जागवण्याचा मंत्र आहे. जाती जपणारे व मोडणारे दोहोंनी हे समजून घेणे आजचा दुभंगणारा समाज पाहता गरजेचा वाटते आहे. आज काय स्थिती आहे? भारतात जाती घट्ट होत चालल्या आहेत. जातीजातींमधील व्देषभाव वाढत चालला आहे. तथाकथित वरिष्ठ जातींमधील वैमनस्य वाढते. दलित जातींमधील अंतर्गत तणाव व संघर्षही वाढतो आहे. जात जपणारे तर जातींचे संगोपन करताहेत पण जात मोडायला निघालेलेही जात जपताहेत . आपला-तुपला करताहेत. सर्वजनांकडून जातींचे पिंजरे पक्के होताना व त्यातून जातीव्देषाची आग पसरत असताना देशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बंधुभाव वाढले तरी कसा ? जे पिढ्यानपिढ्याच्या कधीच आदिवासी नव्हते ते आदिवासींच्या राखीव जागांवर हक्क सांगताहेत .

कोणत्याही एका जातींसाठी आरक्षण घटनेनुसार देता येत नसताना एकाद्या जातीला नादी लावले जाते. समाजासमाजात संवाद नाही . धर्माधर्मात संवाद नाही. सारं वातावरण एकमेकांकडे संशयाने पहायचे झालेय. सत्ताधारी कोणत्याही पक्षांचे असो , काही गट मस्तवाल झालेयत. त्यांना कुणी वरिष्ठ थांबवत नाहीत. विरोधक हतबल व गलितगात्र झालेयत. माध्यमं एका सुरात ‘जय हो’ करताहेत. भारताला धर्मव्देष, जातीव्देष, रंगव्देष, वंशव्देष, भाषाव्देषानं ग्रासले आहे. माणूसकीची हत्या करणारी ही स्थिती भयावह आहे. मग राष्ट्रभावना कशी निर्माण होईल.? अशा स्थितीला डॉ. आंबेडकरांचे विचारधनच देशाला वाचवेल .

“जती जपणारे नि जाती मोडणारेही जात जपताहेत जागजागी
जातीअंताची लढाई कशी होणार फलद्रूप जागजागी
जातीव्देषाच्या रोगानं पछाडलेत इथे सारे जागजागी
माणूसकीचा गहिवर दिसले कसा मग जागजागी”

लेखक-  PROF. DR. SUDHIR GAVHANE, Media& Higher Education Expert , Retired University teacher with 34 years experience at BAMU AURANGABAD [MAHARASHTRA] INDIA. Now Dean at MIT-WPU Pune.