शासकीय निधीचा एकाच कामावर डबल वापर 

pune mahapalika125

पुणे : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मधील सिग्नल यंत्रणेसाठी व काही भागात नवीन सिग्नल बसविण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. असे असतानाही पालिकेच्या वाहतूक शाखेने सिग्नल दुरुस्तीसाठी 66 लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे एकाच कामावर दोन वेळा पालिकेचा निधी खर्च होणार आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी 70 लाख रुपयांचे  इस्टिमेट तयार करण्यात आले आहे. यासाठी पालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये “न्यूक्लीऑनिक्स ट्रॅफिक सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड” यांनी ६६ लाख रुपयांत हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे या कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. स्मार्ट सिटी योजने अंतर्गत आधीच सिग्नलवर 300 कोटी खर्च होणार असून पुन्हा 66 लाख कशाला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका मनमानी कारभार करत असून , शासकीय निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे.