पुणे शहर संघाच्या मल्लांची उत्तेजक द्रव्य चाचणी होणार

पुणे : कुस्ती या खेळाला उत्तेजकांपासून मुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रीय तालीम संघाने मल्लांची उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राष्ट्रीय तालीम संघाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी वरिष्ठ गटाचा संघ पाठविताना त्यांची उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य केली आहे.

आजपर्यंत अनेक खेळाडूंना उत्तेजक द्रव्य चाचणी (डोपिंग टेस्ट) पास करण्यात अपयश आल्याने त्यांना आपले पदक गमवावे लागले आहे. पदक गमावल्यामुळे येणारी निराशा, त्यानंतर खेळापासून घेण्यात येणारी फारकत, अशा गोष्टीमुळे खेळाडू खेळापासून दुरावतो. या गोष्टीचा खेळाडूवर शारीरिक, मानसिक आणि पर्यायाने त्याच्या कारकीर्दीवर विपरीत परिणाम होत असतो. या नाकारात्मक गोष्टी टाळण्यासाठी व कुस्ती हा खेळ डोपमुक्त करण्याच्या हेतून राष्ट्रीय तालीम संघाने हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी संघ पाठविताना उत्तेजक द्रव्य चाचणी घेण्याचा ठराव कार्यकारणीमध्ये मान्य केला.

राष्ट्रीय तालीम संघाची कार्यकारिणी सभा नुकतीच घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, सरचिटणीस शिवाजी बुचडे, शामराव यादव, मेघराज कटके, भास्कर मोहोळ, सहसचिव हेमेंद्र किराड, खजिनदार मधुकर फडतरे, निवृत्ती मारणे, शामराव मते तसेच बहुसंख्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रीय तालीम संघाने यावर्षीपासून भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (साई) नियमानुसार व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुणे शहर संघाच्या वरिष्ठ गटाची उत्तेजक द्रव्य चाचणी अनिवार्य करण्यात येणार आहे. भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्याकडे यासंबधीचा प्रस्ताव आम्ही सादर करत आहोत, अशी माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत अनेक खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीत सापडल्यामुळे त्यांना आपले पदक गमवावे लागले आहे. ही चाचणी स्पर्धेपूर्वीच झाल्यास खेळाडूंना त्याचा निश्चितच फायदा होईल. डोपिंग टेस्टमुळे खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना या संदर्भात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे त्यांचा खेळ उंचावण्यात निश्चितच फायदा होऊन त्यांचे मनोधैर्य वाढेल.

मल्लांची उत्तेजकांपासून दूर राहावे, यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने आगामी काळात खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजी बुचडे यांनी दिली.