fbpx

जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. सगळेच नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा’ असं आवाहन मतदारांना केले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार हडपसर येथे आले होते. यावेळी बोलताना पवार यांनी ‘जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा आणि अमोल कोल्हेंना साथ द्या’ असं आवाहन केले आहे. या विधानातून त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला लगावला आहे. तसेच त्यांनी या सभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एकदा नरेंद्र मोदी बारामतीला आले होते, यावेळी बोलताना त्यांनी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं सांगितले होते, ते तसं म्हणल्यावर मला बोटाची भयंकर चिंता वाटत आहे, फक्त बोट धरल की माणूस एवढा बदलतो, तर हात धरल्यावर काय होईल. त्यामुळे आता संसदेत भेटलो की त्यांनी हात पुढे केल्यावर मी नमस्कार करून मागे होतो. अशी मिश्कील टीका पवारांनी मोदींवर केली आहे.

दरम्यान, अमोल कोल्हेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे हे माळी समाजाचे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली असल्याचं विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. आणि आता शरद पवार यांनीही आढळराव पाटील यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.