‘फक्त अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका, मला अटक होईल’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी-कॉंग्रेसला गळती लागली आहे. अशा परीस्थीतीत उदयनराजे भोसले हे देखील भाजपवासी झाले. शनिवारी उदयनराजे भोसले यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्ली येथे भाजप प्रवेश केला.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना उमेदवारी बाबत विचारले असता ते म्हणाले की, माझ्या समोर उमेदवार पृथ्वीराज चव्हाण असतील तर काय झालं? का नसावेत? लोकशाही आहे. कुणीही उभे राहू द्या, मी उमेदवार आहेच, असे यावेळी भोसले म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, फक्त अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका मला अटक होईल, असा टोला उदयनराजेंनी लगावला.

तसेच आजच्या ‘सामना’तून भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांना चांगलीच समज दिली आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत, अशी ‘सामना’ समज देण्यात आली आहे.