‘ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल करु नका’ ; वडेट्टीवारांवर बावनकुळेंचा पलटवार

vijay waddetiwar

मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण चर्चेचा विषय बनले आहे. तसेच मराठा व ओबीसी समाजात सरकार विरोधात निराशेचे चिन्ह दिसत आहे. दोन्ही समाज आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलन करत आहे. विरोधकांनी ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

तर आता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण रद्द झालं हे भाजपचंच पाप असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपानं नीट भूमिका मांडली असती तर ओबीसींवर ही वेळ आली नसती असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आरक्षण विरोधी आहेत. त्यांची भूमिका चुकीची आहे. म्हणून काँग्रेसनं भूमिका घ्यावी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये राहू नये, असं बावनकुळे यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाचा राज्य सरकार फुटबॉल करत आहे. त्यांनी फुटबॉल करु नये, तर ओबीसींना न्याय द्यावा, असा टोलाही बावनकुळेंनी लगावला आहे.

तसेच यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले होते कि, ‘महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत आहे. राज्य सरकारमधले तीनही पक्ष ओबीसी आरक्षणासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमार्फत आम्ही ओबीसींचा डेटा मिळवू आणि ओबीसी आरक्षण मिळवून देऊ’ असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या