‘काहीतरी करायचंय म्हणून कार्यालय हलवू नका’, भुजबळांचा मंत्री कराडांना टोला

नाशिक : नाशिक येथील जलसंपदा कार्यालये औरंगाबाद व वैजापूर येथे हलविण्याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड केले आहे. वरच्या बाजूच्या भाम, भावली, वाकी व मुकणे या मराठवाड्यासाठी असलेल्या धरणांतील पाणी पिण्याच्या नावाखाली तिकडे शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे या धरणांच्या पाण्याचे नियंत्रण मराठवाड्यातील वैजापूर पाटबंधारे कार्यालयाकडे देण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी भूमिका मंत्री कराड यांनी नुकतीच औरंगाबाद येथे मांडली होती.

मात्र, त्यांच्या भूमिकेला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. ‘मंत्री झालो म्हणून ताबडतोब काहीतरी करून दाखवतोय हे भासवण्यासाठी नदीजोड प्रकल्पासह मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणारे नाशिकमधील कार्यालय हलवू नका. तसेच केद्रांकडून निधी वगैरे आणून देतो अशा अटी-शर्तीही खपवून घेणार नाही, असा टोला भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना लगावला.

नाशिक व मराठवाड्याला महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार पाणी दिले जात आहे. जितके पाणी असेल ते व्यवस्थितपणे व गरजेनुसार दिले जाईल. नाशिक विरुद्ध मराठवाडा असे राजकारण करणे योग्य नाही. प्रत्येकाला नियमानुसार ठरवून दिलेले पाणी मिळणारच आहे. अर्थात जितका पाऊस पडेल व जितके पाणी असेल ते सर्वांना समन्यायी तत्त्वानुसार दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते कराड?
नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत वरच्या भागात असलेली भाम, भावली, वाकी आणि मुकणे या चार धरणांचे दोन उपविभाग नाशिकला आहेत. मराठवाड्याला जर पिण्यासाठी पाणी सोडण्याची वेळ आली तर नाशिक येथील या उपविभागीय कार्यालयांना विनंती करावी लागते. वास्तविक पाहता ही चार धरणे नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत असून, हा प्रकल्प वैजापूर विभागात आहे. यासाठी नाशिकमधील या उपविभागांकडे असलेले या धरणांचे नियंत्रण वैजापूर मुख्यालयाला देण्यात यावे अशी भूमिका कराडांनी मांडली होती.

महत्त्वाच्या बातम्या