पंतप्रधानांच्या आवाहनावर ‘हसावे की रडावे’ हेच कळत नाही : इम्तियाज जलील

औरंगाबाद : कोरोना लॉकडाऊनमुळे महामारीवर मात करण्यासाठी रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे मालवून गॅलरीत उभे रहा. यावेळी मेणबत्ती, दिवे मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा. आपण सर्वजण मिळून कोरोनाच्या या अंधकाराला मिटवूयात. घरातील सर्व लाईट बंद असेल सर्वजण एक एक दिवा लावेल त्यावेळी प्रकाश चारी बाजूनं पडेल आणि आपण सर्वजण सोबत असल्याची भावना निर्माण होईल, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी आज सकाळी देशाला संबोधित केले.

इम्तियाज जलील म्हणाले, आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून काय सांगणार याची उत्सुकता माझ्यासह सर्व जनतेला लागली होती. कोरोनाच्या संकटकाळात देशातील आरोग्य सुविधांची परिस्थिती, लॉकडाऊनमुळे गोरगरिबांची होत असलेली गैरसोय यावर सरकार काय उपाययोजना करणार? किंवा केल्या आहेत , हे मोदीजी सांगतील असे अपेक्षित होते. परंतु देश एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा असताना पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा इव्हेंट घेत त्यात देशवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी उभारला जात आहे. देशातील मोठे लोक कोरोनाबाधीतांवर उपचारासाठी निधी देत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार देशातील जनतेचे कोरोनाच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या आरोग्य सुविधा निर्माण करत आहे. पण देशाच्या पंतप्रधानांनी याआधी लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला लावल्या, आता ते घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्त्या टॉर्च आणि दिवे लावण्यास सांगताहेत. त्यांच्या या आवाहनावर ‘हसावे की रडावे’ हेच कळत नाही. अशी खरमरीत टीका जलील यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे, जगभरातील देश कोरोनाच्या संकटाशी कसा मुकाबला करत आहेत आणि दुसरीकडे आपण मात्र टाळ्या थाळ्या दिवे टॉर्च मेणबत्त्या यातच अडकून पडलो आहोत. आपण देशाला कुठे घेऊन जात आहोत याचा विचार पंतप्रधान मोदी व त्यांच्या अंध भक्तांनी करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी यावेळी म्हणाले आहे.