नामांतरला नुसता विरोध नको तर सत्तेतून बाहेर पडा; आठवलेंचा काॅंग्रेसला सल्ला

ramdas athavale

नांदेड:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर नाव करण्याच्या मुद्यावरून आता महाविकास आघाडीतून काँग्रेसने बाहेर पडावे, असा सल्ला देत आम्ही सत्ता स्थापन करायला तयार आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. नांदेडला कामगार मेळावा आणि बिलोली येथील दिव्यांग मुलीवर झालेल्या सामुहिक अत्याचार व हत्या झालेल्या पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आठवले आज नांदेडमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी औरंगाबादच्या नामांतर मुद्यावरून काॅंग्रेसला सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.

महत्वाच्या बातम्या