‘हिंदुंत्वाची भाषा आम्हाला शिकवू नका’ ; दहीहंडीवरुन शिवसेना-मनसे आमने-सामने

uddhav vs raj

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी मनसेनं कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. कारण मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबतची घोषणा केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं अभिजित पानसे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यात त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचंही नाव नमूद केलं आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून दहीहंडी साजरी करण्याचा मनसेचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी अनेक मंडळांना आवाहन देखील करण्यात आलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असं आवाहन अभिजित पानसे यांनी केलं आहे. मनसेच्या या निर्धारामुळे आता राज्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान आता मनसेच्या निर्धारावर शिवसेनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रवक्ता सचिन अहिर म्हणाले की, दहिहंडीची सर्वपक्षीय बैठक झाली आहे. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रतिकात्मक गणेश उत्सव याबरोबरच वारी देखील खुप चांगली झाली. कोणी जर काही राजकारण करत असेल तर योग्य नाही. दोन डोस झाले असतील तर परवानगी द्या असं म्हणत असतील तर हे कोण कसं ठरवणार? प्रत्यक्षपणे हे ठरवणं शक्य होणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

हिंदुंत्वाची भाषा आम्हाला कोणी शिकवू नये. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भावना ही शिवसेनेची राहिली आहे. कोणाला काय राजकीय आरोप करायचे असतील ते करू द्या. सर्वांनी सहकार्य कराव ही अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता सचिन आहिर यांची मनसेच्या भूमिकेवर दिली आहे. त्यामुळे आगामी काळात दहीहंडी उत्सवाच्या मुद्यावरून या दोन पक्षातील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP