‘लॉकडाऊनग्रस्त’ नागरिकांना सरकारचा सल्ला; घरी बसून चांगल्या सवयी लावून घ्या…!

मुंबई :कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा देशाला संबोधित करत मंगळवारी ही मोठी घोषणा केली.

संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना घरात बसावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर स्वत:चे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी या तीन आठवड्यांत चांगल्या सवयी लावून घ्या, असे आवाहन केंद्र सरकारने मंगळवारी नागरिकांना केले.

लॉकडाऊन पहिला दिवस संपण्याच्या आधीच केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (पीआयबी) या प्रसिद्धी विभागाने मनात आणले तर या मोकळ्या वेळेत बरेच काही केले जाऊ शकते, असे ट्विटरवरून सुचविले. ‘आजपासूनचे पुढचे २१ दिवस तुम्ही सकाळी लवकर उठणे, नवे डाएट अनुसरणे व ध्यानधारणा करणे, यांसारख्या नव्या, साध्या, सोप्या सवयी लावण्यासाठी सत्कारणी लावू शकता,’ असं ट्विटमध्ये ‘पीआयबी’ म्हंटले आहे.

दरम्यान, अमेरिकी लेखक मॅक्स्वेल माल्ट््झ यांचा दाखला देत ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, २१ दिवसांत एखादी वाईट सवय सुटू शकते किंवा नवी चांगली सवय लावून घेता येते. तुम्हीही या ‘लॉकडाऊन’चा तशा प्रकारे आपल्याच भल्यासाठी उपयोग करून घ्या.’