संभ्रमात राहू नका, लक्षणे असतील तर चाचणी करा, तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी केले कळकळीचे आवाहन   

jilha adhikari

भंडारा : परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतो. त्यावेळी वाढलेल्या आजारामुळे अनेकदा रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होत नाही. मृतांचा वाढता आकडा याचाच परिणाम आहे असे म्हणता येऊ शकेल. म्हणूनच जराही शंका आल्यास किंवा लक्षणे दिसल्यास ताबडतोब चाचणी करून उपचार घ्या. जिल्हा रुग्णालयात व कोविड केअर सेंटर मध्ये खाटांची उपलब्धता आहे. कोणत्याही संभ्रमात राहू नका, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी संवाद साधला असता बऱ्याच गोष्टींचा उलगडा त्यांनी केला. जनसामान्यांमध्ये प्रशासनाला एका रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असल्याची चर्चा केवळ अफवा असून असा कोणताही प्रकार होत नाही. पैसे मिळत असल्यामुळे रुग्णांची संख्या वाढवली जाते असा, पसरविला जात असलेला गैरसमज चुकीचा असून यावर विश्वास ठेवू नका असे जिल्हाधिकारी म्हणाले.

पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचा दर चार ते साडेचार टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. मास्क हेच सध्या कोरोना वर एकमेव औषध असल्याचे सांगताना प्रत्येकाने प्रामाणिकपणे मास्क वापरावा, सामाजिक अंतर पाळावे, हात धुवावे आणि कोणतीही शंका किंवा लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब तपासणी करावी. यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी होईल असे ते म्हणाले. रुग्णांच्या वाढत्या मृत्यू संख्या संदर्भात बोलताना त्यांनी आजार बळावल्यावर रुग्णालयाकडे घेतली जात असलेली धाव याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. ताप आला तरी चार ते पाच दिवस रुग्ण घरीच काढतो.

आपल्याला कोरोना झालाच नाही असा समज करुन दिवस घरी काढले जातात आणि संसर्ग जास्त झाला की रुग्णालयात येतात. मात्र तोपर्यंत आजार वाढून रुग्णाचा जीव वाचविणे कठीण होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे चाचण्या करा, ते नुकसानीचे नाही उलट आपल्यासोबत दुसऱ्यांसाठी ही फायद्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. ऑंटीजिन चाचणीच्या संदर्भात लोकांमध्ये असलेला संभ्रम चुकीचा असल्याचे ते म्हणाले.

रुग्णालयातील खाटाची उपलब्धता, ऑक्सिजन आणि भविष्यातील व्यवस्थे संदर्भात बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, आयसीयू मधील बेडची संख्या आधी 30 होती आता पंचवीस वाढविण्यात आले आहेत. बारा ऐवजी 35 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भंडारा येथील सामान्य रुग्णालयाच्या सेंटरमध्ये 180 तर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये 241 असे एकूण 425 च्या घरात बेड रिकामे असल्याचे त्यांनी सांगितले. ही क्षमता पुढेही वाढवण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

भंडारा शहरातील चार खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून उपचारसाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगून शासकीय रुग्णालय प्रयत्न त्यांनी स्पष्ट केले. ऑक्सिजन ची उपलब्धता भरपूर असून भविष्यातील गरज पाहता 200 नवीन सिलेंडर मागणी केली असल्याचे ते म्हणाले. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच कामे पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले. गर्भवती महिलांना कोरोना ची बाधा झाल्यास उपचारासाठी आतापर्यंत नागपूरला जावे लागत होते. यासंदर्भात विचारले असता सामान्य रुग्णालयातच अशा महिलांसाठी स्वतंत्र ऑपरेशन थेटर उभारले जाणार आहे. पुढच्या सात ते आठ दिवसात अशा रुग्णांवर जिल्हा स्थानी उपचार केले जातील असेही जिल्हाधिकारी म्हणाले. चाचण्या वाढवून रुग्ण शोधण्यावर भर दिला जात असल्याचे सांगताना माझा परिवार माझी जबाबदारी अभियान यासाठी पोषक ठरणार असल्याचे ते म्हणाले.

रुग्णांना चांगले उपचार आणि सुविधा मिळाव्यात यासाठी शक्य ते नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सर्व शक्ती पणाला लावून कोरोना ला थांबविण्यासाठी झटत आहे. नागरिकांनीही अंगावर आजार न काढता वेळीच चाचण्या करून येणारे संकट टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी तभाशी साधलेल्या संवादातून केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-