नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नका – अजित पवार

अजित पवार

कोल्हापूर  – पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्यशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे. ‘पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभं करण्याचं काम राज्यशासन करेल अशी ग्वाही देवून पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिल्या.

शिरोली व किणीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग (एनएच – ४ ) बंद झाला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली. भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन २००५, २०१९ व २०२१ मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करुन महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. तर राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती, राडारोडा साचून नदीपात्रात गाळ साचला असल्यास नदीचा गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का याचा अभ्यास करून उपाययोजना सूचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. याबरोबरच नदीच्या प्रवाहाला अडथळा येऊ नये, यासाठी नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नका, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला केल्या.

राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह काही जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने करा. काही रस्त्यांवर ब्रिटीशकालीन मोऱ्या आहेत. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने यापुढे ब्लॉक पद्धतीने किंवा स्लँब टाकून रस्त्यांची बांधणी करा. पुरग्रस्तांसाठी मदतकार्याबरोबरच या भागातील साफसफाई करुन घ्यावी तसेच मोफत अन्नधान्य वितरणावर लक्ष द्यावे. पूरग्रस्त भागासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अत्याधुनिक बोटी घ्या, असे सांगून सब मर्शिबल पंप, सक्शन यंत्र व अन्य यंत्रसामग्री घेण्यासाठी शासन मदत करेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी गावातील उंच ठिकाणच्या गायरान जमिनींची निवड करावी. जिल्ह्यातील दत्त, गुरुदत्त, जवाहर आणि शरद या साखर कारखान्यांच्या परिसरात  रहिवासी चाळ उभी केल्यास कायमस्वरुपी स्थलांतरित होण्यासाठी इच्छुक नसणाऱ्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय होईल. इतर वेळी ऊसतोड कामगारांची याठिकाणी व्यवस्था होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात वेळेत वीजबिल भरणा करणारा कोल्हापूर जिल्हा आहे, याबद्दल कोल्हापूरकरांचे कौतुक करुन गरज भासल्यास अधिक मनुष्यबळ घ्या, पण जिल्ह्यातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल्या. तसेच पूरपरिस्थितीत देखील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होवू नये, यासाठी उपाययोजना करा.पूर परिस्थितीमुळे झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख, केंद्र शासनाकडून २ लाख व शेतकरी असल्यास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून २ लाख रुपयांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिवीत व वित्त हानी झाली आहे. शेती, रस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात दरड कोसळणे, भूस्खलन झाले आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ व राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी जिल्ह्यातील विविध भागात रस्ते, पूल, शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे झालेल्या हानीबाबत माहिती दिली.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पूरबाधित गावांमध्ये एनडीआरएफ पथक, जिल्हा प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने पुरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहर परिसरातील पूर परिस्थिती, मदतकार्य व नुकसानीबाबत सादरीकरण केले.बैठकीत आमदारांनी पूरपरिस्थिती निवारण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या. विविध विभाग प्रमुखांनी पूरस्थितीबाबत आवश्यक ती माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या