घाबरू नका, सतर्क रहा :- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : जगभरामध्ये हैदोस माजवणारा कोरोना व्हायरस भारतामध्ये दाखल झाला होताच परंतु तो कालपर्यंत तरी महाराष्ट्रा मध्ये आढळला नव्हता, परंतु काळ रात्री पुण्यामध्ये याचे दोन रुग्ण असल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
कोरोनाचे हे दोन रुग्ण पुण्यामध्ये आढळल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांना आवाहन केलं आहे, ते म्हणाले कि या दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास देखील ठेवू नये.

कोरोनाच्या संशयित रुग्णावर लक्षणांवर आधारित उपचार केले जात असून केरळ येथेही तीन रुग्ण आढळून आले होते त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचे नमुने पुन्हा निगेटीव्ह आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सध्याच्या घडीला कोरोनाचे हे संकट संपुष्टात आणणे हे राज्य आणि केंद्र सरकारपुढील मोठे आव्हान आहे. शक्य त्या सर्व उपाययोजना करताना दिसून येत आहेत, तर पुणे महानरपालिका देखील त्यांच्या पातळीवरती शक्य तेवढी उपाययोजना करत आहे.