पाऊस पडावा म्हणून अजब उपाय

वेबटीम: निम्मा जुलै महिना संपत आला मात्र अद्याप म्हणावा तसा पाऊस नाही त्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणावर चिंतातुर असल्याचं चित्र आहे.पाऊस पडावा म्हणून गावाकडे वेगवेगळ्या मार्गाने देवाकडे प्रार्थना केल्या जातात .कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार या गावातील ग्रामस्थांनी पाऊस पडावा यासाठी चक्क गाढवाचं लग्न लावून दिलं आहे .या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्यानिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं
 पावसाने ओढ दिल्याने चिंतातुर झालेल्या वाठार (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांनी वेगवेगळे विधि करून पावसासाठी याचना केली. मंगळवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन दिवस पाळक ठेवण्यात आला. या विधीनुसार पाऊस पडावा म्हणून गाढवाचे लग्न लावण्यात आले.सध्या वाठार येथील परिसरात पाऊस न पडल्याने बळीराजा धास्तावला आहे. रोहिणी नक्षत्रात पेरणी झालेल्या पिकांची चांगली उगवण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने उगवलेले पीके धोक्यात आली आहेत.
 या संदर्भात वाठारच्या जेष्ठ नागरिकांनी हनुमान मंदीरात बैठक घेऊन पाऊस पडण्यासाठी धार्मिक उपाय योजना करण्याचे ठरवले.या बैठकीत पाळक दिन घेण्याचे ठरवले. मंगळवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेऊन पाळक पाळण्यात आला. सकाळी धार्मिक विधीनुसार गाढव व गाढवीणीचे लग्न लावून देण्यात आले. गाढव व गाढवीणीची यावेळी गावात मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी देवदेवतांची पूजा करुन ग्राम दैवत हनुमान देवाला अभिषेक घालण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी यावेळी उत्स्फुर्तपणे हजर राहून पावसासाठी याचना केली.