ठरले! गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात, भाजपच्या बैठकीत निर्णय

ठरले! गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात, भाजपच्या बैठकीत निर्णय

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी कालच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आता घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार भुपेंद्र पटेल यांची वर्णी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर लागली आहे. रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी भाजपची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत चर्चा होत्या. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती.

ज्या नेत्यांची नावे संभाव्य मुख्यमंत्री पदासाठीच्या नावांची यादी होती, त्या यादीपैकी कुणालाही संधी न देता वेगळं नाव समोर आलेलं दिसत आहे. त्यानंतर आता गुजरात भाजपने भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे.

भूपेंद्र पटेल हे घरलोदिया येथून आमदार आहेत आणि माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे मानले जातात. भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील काम पाहिले आहे. भूपेंद्र पटेल हे शहरी भागातून येतात. आनंदीबेन पटेल यांच्याच मतदारसंघातून भूपेंद्र पटेल हे विक्रमी मतांनी निवडूण आलेत. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाने पटेल मुख्यमंत्री दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या