शाळेतील शिक्षकांनाच बंदूका द्या- डोनाल्ड ट्रम्प

टीम महाराष्ट्र देशा- मागील काही दिवसांपासून शाळांवर दहशतवादी हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आहे या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी शिक्षकांनाच बंदूका देण्यात याव्यात असा जालीम उपाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवला असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

फ्लोरिडा येथील शाळेत मागील आठवड्यात झालेल्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या नातेवाईकांची तसेच या हल्ल्यातून बचावलेल्यांची ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. फ्लोरिडा हल्ल्यातून वाचलेल्या मुलाशी आणि मृतांच्या नातेवाईकांशी तासभर चर्चा केल्यानंतर त्यांनी अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी शिक्षकांना शस्त्रसज्ज करण्याचा विचार बोलून दाखवला.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

आम्ही देशातील बंदूक संस्कृतीवर अंकूश आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून जर शाळेमधील शिक्षकांना बंदूक चालवण्याची समज असेल किंवा त्यांना तसे प्रशिक्षण दिले तर अशाप्रकारचे हल्ले थांबवता येऊ शकतात. प्रत्येक शाळेतील २० टक्के शिक्षकांना जरी बंदूक चावलण्याचे प्रशिक्षण दिले तरी अशा हल्ल्यांना योग्यप्रकारे उत्तर देता येईल . बंदूकींचा परवाना देताना संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली जाण्यासंदर्भातील उपाययोजना आणि नियम कठोर करुन ते लवकरात लवकर अंमलात आणले जातील तसेच ठरवीक वयापर्यंतच्या व्यक्तींवर ठरावीक बंदूक खरेदी करण्यासंदर्भात बंदी घालण्याचा नियम बनवण्याच्या उपाययोजना करण्यात येतील.