अखेर भेटीचा मुहूर्त ठरला; डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन १२ जूनला भेटणार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मात्र आता हे  वैर बाजूला सारून , दोन्ही नेत्यांनी भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते  12 जून रोजी सिंगापूर येथे भेटणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 12 जून रोजी मी आणि किम जोंग उन सिंगापूर येथे भेटणार आहोत. आम्ही या भेटीला जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून खास बनवण्याचा सर्वतोपरी  प्रयत्न करणार आहोत.  याआधी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि आपली बैठक उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर स्थित असलेल्या पीस हाऊसमध्ये होऊ शकते, अशी शक्यता ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी वर्तवली होती. मात्र त्या मुद्यावर एकमत होऊ शकले नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि दक्षिण कोरियाचे हुकूमशाह यांच्यातील ही पहिलीच शिखर बैठक असेल. त्यामुळे या भेटीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचा हुकूम शाह किम जोंग उन याने दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. त्यावेळी दोऩ्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोरियन द्विपकल्पात असलेला तणाव निवळण्यास मदत झाली होती. किमच्या दक्षिण कोरिया दौऱ्याकडे एक ऐतिहासिक घटना म्हणून पाहिले गेले होते. कारण  त्याआधी शस्त्रसज्जता वाढवण्यात गुंतलेल्या किमने दक्षिण कोरियाच नाही तर अमेरिकेलाही हल्ले करण्याची धमकी दिली होती.

Gadgil