सातारा : डॉल्बी वाजवला तर गुन्हा दाखल करणारच – तेजस्वी सातपुते

टीम महाराष्ट्र देशा : गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांची ध्वनिक्षेपक यंत्रणा तत्काळ जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

पोलिसांनी गेल्या महिन्याभरात गणेश मंडळ, डॉल्बीमालक आणि चालकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्या उप्परही विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजू नये, यासाठी विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. फलटण पोलिसांकडे ध्वनिमापक यंत्रे देण्यात आली आहेत.

आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. या गुन्ह्यात दोषींना सश्रम कारावास होऊ शकतो, असे सातपुते यांनी सांगितले. मिरवणूक मार्गावर पार्किंग बंदी करण्यात आली आहे. नाना पाटील चौकातून पंढरपूरकडे जाणारी वाहतूक सोमवार पेठेतील बाह्य वळणाकडे वळवण्यात येणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी क्रेन ठेवण्यात आली असून लाईफगार्ड नेमण्यात आले आहेत, असे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या