‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा

‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली आहे.

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. परंतू राज्यसभा निवडणूक टाळण्याच्या हेतून नाना पटोले, थोरातांनी गुरुवारी फडणवीस यांची भेट घेतली.

परंतु या भेटीमुळे महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष नाराज झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का? असा प्रश्न उपस्थित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उपस्थित केल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. त्यातच ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीने भाजपवर डुख धरलेला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानं शिवसेना-राष्ट्रवादीला हे रुचलेले दिसत नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या