‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’

‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’

मुंबई : ‘आजि सोनियाचा दिनु… कष्टाकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय. महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली,’ अशा शब्दात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे रविवारी कौतुक केले होते. बीबीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते.

पण पवारांचे हे कौतुक भारतीय जनता पक्षाला फारसे रुचलेले नाही. पवारांनी नेमके कशासाठी मुख्यमंत्र्यांचा कौतुक केले, असा सवाल करत, भाजपने मुख्यमंत्र्यांच्या अपयशाची यादीच जाहीर केली आहे. याबाबत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या अपयशाचा पाढा वाचला आहे.

गेले दीड वर्ष मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील शाब्दिक खेळ, भावनिक आवाहनं आणि ड्रायव्हिंग हेच जनता पाहत आलीय. मुख्यमंत्री ठाकरे आता ज्या प्रकल्पांचा शुभारंभ करत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू केले आहेत,’ असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांच्या अपयशी कारकिर्दीची यादीच सादर केली आहे. ‘कोरोनातील अपयश, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश, ओबीसी आरक्षण अपयश, पूरग्रस्तांना मदतीत अपयश, शेतकऱ्याना मदतीत अपयश…’ अशी ही यादी आहे. ही अपयशाची यादी आणखी वाढू शकते,’ असंही उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केले होते. ‘मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर सातत्याने काहीना काही संकट येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट आलं. हजारो घरं पडली. हजारो घरांमध्ये पाणी शिरलं. होतं नव्हतं ते वाहून गेलं, खराब झालं. पण एक गोष्ट चांगली आहे, की या संकटांवर देखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली’ असे शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या