तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?

नवी दिल्ली : भारतात कोरोना बाधितांचा आकडा 4000 पार गेला असून तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4000 कोरोना बाधितांपैकी 291 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे 58 नवीन रूग्ण आढळून आले. राज्यामध्ये आतापर्यंत संख्या 500 पार पोहोचली आहे. तर फक्त दिल्लीमध्ये 320 कोरोना बाधित आहेत. कोरोनापुढे अख्खं जग हतबल झालं असून भारतातही कोरोना फोफावत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना वृत्तवाहिन्यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचं वारंवारं वेगळ चित्रं निर्माण केलं गेलं नसतं. एखाद्या वर्गाचं असं चित्रं निर्माण करून त्यात सांप्रदायिक भर घालण्याची संधी वृत्तवाहिन्यांना मिळाली नसती, असं सांगतानाच दिल्लीत जे घडलं ते रोज दाखवण्याची गरज आहे का? त्यातून आपण कोणती परिस्थिती निर्माण करू पाहतोय, याचा विचार वृत्तवाहिन्यांनी करण्याची गरज आहे, असं देखील पवार म्हणाले.

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा परिस्थितीत दिल्लीत मरकजचा धार्मिक मेळावा व्हायला नको होता. महाराष्ट्र सरकारने जशी मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर बरंच नियंत्रण आलं असतं, असं पवार म्हणाले.