धनंजय महाडिक यांना मोहोळचा नकाशा तरी माहिती आहे का? : बाळराजे पाटील

पुणे : ‘खासदार धनंजय महाडिक यांना मोहोळ मतदारसंघाचा नकाशा तरी माहिती आहे का?  त्यांचे कार्यक्षेत्र हे ३० गावापुरते आहे. त्यांना आमच्या मतदारसंघातील गावेही माहिती नाहीत. अशी टीका माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी केली.

लोकशक्ती भीमा सहकारी कारखान्यावरील सत्काराच्या कार्यक्रमात  खासदार धनंजय महाडिक यांनी ‘राष्ट्रवादी-काँग्रेसने मोहोळ मतदार संघात आम्ही सांगू तो उमेदवार द्यावा,आम्ही त्याला निवडून आणू’, असे विधान केले होते.

त्यावर बाळराजे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी कोल्हापुरात त्यांनी भाजप सदस्यांच्या गाडीचे चालक म्हणून काम केले आहे. मोहळ तालुक्यात तर महाडिकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून सगळ्या पक्षाशी आघाडया केल्या आहेत. महाडिक यांनी पक्ष वाढावा म्हणून कधीही प्रयत्न केलेला नाही उलट पक्षाचा तोटा होईल असेच त्यांचे आतापर्यंत धोरण राहिले आहे.