नांदेड ग्रामीण रुग्णालयाला कोणी डॉक्टर देता का… डॉक्टर!

नांदेड: कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग आरोग्य यंत्रणा बळकट करत असताना मात्र नांदेड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. माहूर येथील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड १९ ची लागण झाली असून तर एक डॉक्टर सुटीवर असल्याने आयुष व इतर तात्पुरत्या तत्वावर कोविड अनुषंगाने नेमण्यात आलेल्या डॉक्टरांच्या हातात रुग्णाची नाडी आली असून रात्री मात्र केवळ नर्सच ड्युटी बजावत असल्याने डॉक्टरांना रुग्णाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. सर्वत्र महामारीचे थैमान सुरु आहे. लोकसंख्येप्रमाणे रुग्णालये व डॉक्टरसह साहित्य ही अपुरे पडत आहेत. तालुका भरात लाखोच्या लोकसंख्येवर फक्त एकच ग्रामीण रुग्णालय आहे. त्याठिकाणीही अत्यावश्यक सुविधा नसल्याने रुग्णाचे बेहाल होत आहे.यातच माहूर ग्रामीण रुग्णालयातील तीन डॉक्टर कोरोना बाधीत झाले आहेत. त्यामुळे शेकडोच्या संख्येत येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळणे अवघड झाले आहे.

कोरोना च्या धास्तीने नागरिकात सर्दी,खोकला, ताप या आजाराची दहशत निर्माण झाली असताना डॉक्टरांचा अभाव असल्याने खाजगी डॉक्टरांचे उंबरठे रुग्णांना झिजवावे लागत आहेत. त्यांना आर्थिक भार तर सहनच करावा लागत आहे, शिवाय मनस्ताप ही होत आहे. माहूर हा आदिवासी बहुल भाग असल्याने व एकमेव ग्रामीण रुग्णालय असल्याने या ठिकाणी रात्री बे रात्री रुग्ण येतच असतात. असाच एक रुग्ण तीन दिवसापूर्वी रात्री आला होता.दवाखान्यात पोहचल्यावर सदर रुग्ण दगावला.

त्या रुग्णाच्या नातेवाईकांची आणि डॉक्टर व नर्स यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती असून या प्रकरणी डॉक्टरांनी पोलिसात माहिती ही दिल्याचे समजते. याशिवाय दि ५ रोजी लखमापूर येथील एक गर्भवती महिला बाळंतपणासाठी आली होती. तिच्यावर दिवसभर नर्सच्या माध्यमातून उपचार होऊन ऐन बाळंतपण ची वेळ आली असता डॉक्टर अभावी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. यवतमाळ पोहचत असताना दवाखान्याच्या कंपाऊंडमध्ये महिलेची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या