पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही: यशस्वी यादव

aurangabad cp yashasvi yadav

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये अनेक कामं करायची इच्छा होती. पण सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारच्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील, असा आशावाद व्यक्त करत पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी इच्छा ही व्यक्त केली.

आठ तारखेला मिटमिटा गावात पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला उत्तर म्हणून पोलिसांनीही काही घरांवर दगडफेक केली. दरम्यान, काही नागरिकांना अटक करण्यात आली. या मुद्द्यावरुन एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व शिवसेनेचे आमदार आमदार संजय शिरसाठ यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

आज “औरंगाबाद कचरा प्रश्न” विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात मांडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. कचराप्रश्नावरून आंदोलकांवर झालेला लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर निर्णय देत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे याविषयी प्रतिक्रिया देताना औरंगाबादमध्ये अनेक चांगली कामं करायची इच्छा होती. पण सक्तीच्या रजेवर पाठवायच्या सरकारच्या निर्णयामुळे ही कामे आता नवीन अधिकारी पूर्ण करतील व पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नाही, असे ते म्हणाले. तसेच औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.