संमेलनाच्या वादात राज्य सरकार ला गोवण्याचा प्रयत्न करू नका : मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरवात होण्यापूर्वीच अनेक वाद निर्माण झाले आहेत. संमेलनाची गरिमा व विश्वासाहर्ता संपलेली आहे. उद्घाटनापूर्वीच या संमेलनाचे सूप वाजले आहे.त्यामुळे हे संमेलनच रद्द करावे, अशी मागणी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने केली आहे. तर सहगल यांनी असहिष्णूतेच्या विषयावर भाषण केल्यास सरकारला सहन होणार नाही या भीतीने मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक नयनतारा सहगल यांची उपस्थितीच सरकारी दबावामुळे रद्द करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे साहित्य विश्वातून अनेक प्रतिक्रिया येत असून आता मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकांचा असतो, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते , तसेच साहित्य संमेलनांमधून सरकारांवर आणि समाजातील निरनिराळया विषयांवर विचार प्रकट होत असतात. तसेच या विचारांचे सरकारसुध्दा सकारात्मकपणेच स्वागत करत असतं. त्यामुळे अकारण ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून करण्यात आलं आहे.