‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करू नका; तेजस्वी सातपुतेंचा विद्यार्थिनींना सल्ला

पुणे : कायद्याने मुलींना अधिक संरक्षण दिले आहे. त्याचा चांगला वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये बजवावीत. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती मनातून काढून टाकून स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विद्यार्थिनींना दिला.

येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या महिला विकास केंद्रातर्फे संस्थेतील विद्यार्थीनींसाठी ‘महिला सक्षमीकरण व वाहतूक जनजागृती’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत तेजस्वी सातपुते बोलत होत्या. यावेळी कोंढवा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सी. एम. निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, कार्यशाळेचे समन्वयक व प्राचार्य डॉ. सुहास खोत, महिला विकास केंद्राच्या प्रमुख प्रा. अमृता ताकवले, प्रा. रोहिणी आगवणे, प्रा. ऋतुजा मोरे, प्रा. पूजा चौधरी आदी उपस्थित होते.

तेजस्वी सातपुते म्हणाले,आर्थिक परिस्थिती चांगली म्हणजे महिला सक्षम आहे, असे नाही. चांगले शिक्षण घेऊन, निर्धास्तपणे स्वतःला घडविणे गरजेचे असते. योग्यवेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी शिक्षण आणि ज्ञानाची गरज आहे. कायद्याविषयी जाणून घेत योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. कोणाला त्रास देण्याच्या हेतूने कायद्याकडे बघू नये. मात्र, लैंगिक अत्याचाराला बळी न पडता तात्काळ आवाज उठवण्याची हिम्मत मुलींनी-महिलांनी बाळगावी. त्यासाठी पोलीस काका, विशाखा समिती, बडी कॉपची मदत घ्यावी. वाहतुकीचे नियम पाळण्यासोबतच हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केला पाहिजे.

या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्यार्थिनींना हेल्मेट वाटप करण्यात आले. सीएम निंबाळकर, डॉ. हेमंत अभ्यंकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. सुहास खोत यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. प्राजक्ता देशमुख यांनी केले. प्रा. अमृता ताकवले यांनी आभार मानले.