वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नका – महावितरण

पुणे – पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत थ्री फेजचे पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. या वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी पुरेसे थ्री फेजचे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे २० कि व्हो पेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांसाठीही पुरेसे सीटी ऑपरेटेड टीओडी वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी पुरेसे मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पेडपेडींगमधील नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्याचे तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. नवीन मीटर लावल्यानंतर त्याची महावितरण अंतर्गत ईआरपीमध्येही (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) तात्काळ नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली आहे. महावितरणची वेबसाईट किंवा मोबाईल अॅॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणाऱ्या शुल्काची माहिती उपलब्ध आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.

वीजग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, तक्रार असल्यास त्यांनी थेट संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांंना अथवा कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून द्यावी. महावितरणकडून वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ सह कार्यालयीन ग्राहकसेवा अतिशय सुलभपणे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

केशरकाकू-एक राजकीय झंजावात

‘जलयुक्त’मुळे महाराष्ट्राला दुष्काळ भेडसावणार नाही – परिवहनमंत्री दिवाकर रावते