शहीदांचे राजकारण करु नका! सैन्याने ओवेसींना बजावले

शहिदांचा धर्म नसतो, ज्यांनी शहिदांच्या धर्मावर भाष्य केले त्यांना सैन्याची पुरेशी माहिती नसावी

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान मुस्लीम असल्याचे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हटले होते. सैन्याने त्यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी ओवेसींना फटकारत, शहिदांचा धर्म नसतो, त्यांच्या बलिदानाला आम्ही धार्मिक रंग देत नाही. ज्यांनी शहिदांच्या धर्मावर भाष्य केले त्यांना सैन्याची पुरेशी माहिती नसावी, अश्या शब्दात बजावले.

ज्यांनी अशा स्वरुपाचे विधान केले आहे त्यांना सैन्याविषयी पुरेशी माहिती नाही. आम्ही कधीच शहीदांचा धर्म बघत नाही. शहीदांचे राजकारण करु नका. जैश-ए- मोहम्मद, लष्कर- ए- तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या तिन्ही दहशतवादी संघटना आमच्यासाठी समानच आहेत. हातात बंदुक घेतलेला प्रत्येक जण आमच्यासाठी दहशतवादीच आहे मग तो कोणत्याही संघटनेचा असू दे, अशे सैन्याच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी बुधवारी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले.

काय म्हणाले होते खासदार असदुद्दीन ओवेसी?

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणी काहीच बोलताना दिसत नाही. मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घेतला पाहिजे, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणीच काही बोलताना दिसत नाहीये. मुसलमानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांनी आणि आजही पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घ्यायला हवा.. आम्ही तर देशासाठी जीव देत आहोत.