शिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा; लोकांच्या घरावरून नांगर फिरू देणार नाही- अशोक चव्हाण

मुंबई: शिवसेनेचे वरून कीर्तन आतून तमाशा सुरू आहे. नाणार प्रकल्पावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. या प्रकल्पामुळे कोकणातील शेतकरी उद्धवस्त होणार आहे. लोकांच्या घरावरून कोणत्याही परिस्थितीत नांगर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. नाणार प्रकल्पाविरोधात काँग्रेसचे शिष्टमंडळ आज कोकणात गेले होते. त्यावेळी आयोजित सभेत चव्हाण बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले, “काँग्रेस या सरकारची कोणत्याही परिस्थितीत दंडेलशाही चालू देणार नाही. लोकांच्या काय भावना आहेत, हे आम्ही जाणतो. महाराष्ट्रात सगळीकडे शेतकरी आत्महत्या झाल्या. पण कोकणात एकही आत्महत्या झालेली नाही. पण सरकारने जर आमचे ऐकले नाही, उद्या सर्व काही टोकाला गेले तर कोकणातला माणूसही आत्महत्या करेन. बहुमत आहे, म्हणून कोणाकडे पाहायचं नाही”

चव्हाण पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे येथे येऊन मेळावा घेऊन गेले. इथल्या लोकांना सांगितले की रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही म्हणून आणि मुंबईला जाऊन ते काहीच करत नाहीत. हे सरकारमधून बाहेरही पडत नाही. आम्ही सरकारकडून करण्यात येणारी दंडेलशाही चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले.