मला टार्गेट करण्यासाठी नागपूरची बदनामी करू नका-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री

नागपूर: तुमच्या हाती सत्ता होती तेव्हा काहीच केले नाही. आत्ता नागपूरचा होणारा विकास तुम्हाला सलतो आहे. तेव्हा मला टार्गेंट करण्यासाठी तुम्ही बदनामी करीत सुटले आहात. पण, कृपया असले उद्योग करू नका या आवाहनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी विरोधकांना खडे बोल सुनावलेत.

Loading...

कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री उत्तर देत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती नियंत्रणात आहे आणि ती उत्तम राखणे सरकारसाठी सर्वोपरी आहे. नागपुरातील भाजपाचा नेता आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना यादव याला राजाश्रय असल्याचा आरोप करीत विरोधकांनी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. आज उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले की, मुन्ना यादवच्या बचावाचे काहीच कारण नाही. गुन्हेगार असेल तर आज ना उद्या १०० टक्के कारवाई होणारच. आतापर्यंत कारवाईत पोलिसांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. ते स्वत:चा बचाव करतील. मुळात सध्याचा गुन्हा हा त्यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या मारहाणीवरून दाखल झाला आहे. त्यांना विरोधक कुख्यात गुंड म्हणतात पण त्यांच्यावर आधी दाखल झालेले गुन्हे त्या स्वरुपाचे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपुरातील गुन्हेगारी घटल्याचे सांगताना त्यांनी तिरपुडे इन्स्टिट्यूटचा अहवालही सभागृहात ठेवला. नागपूरची बदनामी विनाकारण झाली तर येणारी गुंतवणूक अन्यत्र जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. एनसीआरबीचा अहवाल देत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुन्हेगारी घटल्याची आकडेवारीच दिली, खून, दरोडा, दंगल, दखलपात्र गुन्हे, अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचार, महिलांचे अपहरण, बलात्काराचे प्रमाण आमच्या सरकारमध्ये तर दरवर्षी घटत आहेच पण आघाडी सरकारच्या तुलनेतही ते कमीच आहे, असे ते म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या सहातदेखील नाही. क्रमांक एकवर असल्याचा विरोधकांचा दावा फोलच आहे. गुन्हासिद्धतेचे प्रमाण आघाडी सरकारमध्ये 15 टक्क्यांवर कधीही गेले नाही. ते आज 34.8 टक्क्यांवर गेले आहे. राज्य पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 20 हजार112 बेपत्ता मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले आहे.

देव गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला
सोशल मिडीयाचा गैरवापर अयोग्य देव गायकवाड या व्यक्तीने मध्यंतरी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध काही पोस्ट टाकल्या होत्या. प्रत्यक्ष तपासात ती व्यक्ती महादेव बालगुडे असल्याचे सिद्ध झाले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या पोस्ट शेअर करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या, त्यात एक पत्रकारदेखील होता. सोशल मीडियाचा गैरवापर दंगली घडविण्याच्या, सामाजिक अशांततेसाठी केला जात असेल तर कारवाई ही केलीच जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. यावेळी अजित पवारांना टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले की, बालगुडे हा बारामतीचा असून तो राष्ट्रवादीच्या शिबिरात होता त्यामुळे त्याला आम्ही पवारांचा माणूस समजत नाही.नसत्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना सांगलीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक सचिन सावंत यांची आठवण करून देत चिमटा काढला. खून, खुनाचे प्रयत्न, गंभीर दुखापतीचे गुन्हे सचिन सावंतविरुद्ध दाखल आहेत. तो तुमच्या जवळचा आहे असे लोक म्हणतात. ‘आम्ही त्याला मकोका लावणार आहोतच, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. लोक म्हणतात म्हणून सावंत तुमच्या जवळचा ठरत नाही तसेच मुन्ना यादव माझा मतदारसंघ सांभाळतो अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

न्यायासाठी सरकार वचनबद्ध
सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणत्याही पोलीस कर्मचा-याला पाठीशी घातले जाणार नाही. पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील नितीन आगे हत्येप्रकरणी उच्च न्यायालयात सरकार दाद मागणार आहे. त्यासाठी नामवंत वकील शासन देईल. त्याबाबत नितीनच्या वडिलांशी आपली चर्चा झाली आहे. या हत्येप्रकरणी फितूर झालेल्या 13 साक्षीदारांविरुद्ध येत्या एक महिन्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतील बेपत्ता पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्याचा संशय पोलिसांना तपासामध्ये आलेला आहे, असा खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. बिद्रे बेपत्ता झाल्यानंतरच्या तीन दिवसात त्यांच्या आणि या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या मोबाईलचे लोकेशन एकच होते. बिद्रे यांच्या लॅपटॉपमधील मजकूर, व्हिडीओ कॉलिंगच्या तपासात कुरुंदकर आणि त्यांच्यातील संबंध निश्चितपणे प्रस्थापित होतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.Loading…


Loading…

Loading...