कोरोनाचे सौम्य लक्षणे असल्यास CT-SCAN करू नका, एम्सच्या संचालकांनी सांगितलं गंभीर ‘कारण’

नवी दिल्ली : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. अशातच आता कोरोना रुग्णांच्या आरोग्याबाबत नवनवे खुलासे समोर येत आहेत.

या लाटेत लक्षणे असूनही RT-PCR चाचण्यांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न होत नसल्याने रुग्णांना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे, सिटी स्कॅन करण्याचे प्रमाण वाढले असून आता याचे दुष्परिणाम देखील भयंकर असल्याचं समोर येत आहे. आता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सिटी स्कॅन करण्यापूर्वी एक गंभीर इशारा दिला आहे.

‘सिटी स्कॅन विचारपूर्वक करायला हवा. सीटी स्कॅन हे तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे, हे अत्यंत हानिकारक आहे,’ असं भाष्य रणदीप गुलेरिया यांनी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत केलं आहे. ‘घरीच विलगीकरणात राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्कात राहणे गरजेचे आहे. सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणासारखी परिस्थिती आहे किंवा आपल्या छातीत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असा सल्ला देखील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या