धनंजय मुंडे माझ्याविषयी भाष्य करु नका, नाहीतर!- नारायण राणे

औरंगाबाद : मराठा आणि मुस्लिम आरक्षणसंदर्भात भाजपा सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याने आपण एनडीएमध्ये आहे. असे विधान काल नारायण राणे यांनी केले होते. काँग्रेस सोडल्यानंतर महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांपेक्षा वेगळे आणि भारतीय घटनेशी प्रामाणिक राहून जनतेसाठी काम करता यावं म्हणून मी वेगळ्या पक्षाची स्थापना केली असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. मराठ्यांना आरक्षण देण्याची भाजपाची मानसिकता आहे.

धनंजय मुंडेंनी माझ्या स्वाभिमानाबद्दल मुळीच बोलू नये. तो जपायला मी समर्थ आहे. तुम्ही लहान आहात. माझ्याविषयी भाष्य करु नका नाहीतर मी सुरु होईन. असा टोला नारायण राणे यांनी धनंजय मुंडेना लगावला. ते औरंगाबादमधील सभेपूर्वी पत्रकारांशी बोलत होते. राज्यात विरोधी पक्षांकडून हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. नेतेमंडळी सभा घेऊन टीका करत आहेत. सत्तेत असलेल्यांना आणि सत्ता भोगलेल्यांना हा नैतिक अधिकार आहे का? यावर जाहीर सभेत भाष्य करणार असल्याचे राणे म्हणाले.