गणेशमूर्तींची दरवाढ जीएसटीमुळे नाही

जीएसटीच्या नावाखाली दरवाढ करून ग्राहकांची फसवणूक करू नका - प्रशासन

पुणे : यंदा २५ ऑगस्ट पासून गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदा, वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) गणेशमूर्ती महागणार असल्याची चर्चा सुरु आहे.तसा दावा  विक्रेत्यांकडून केला जात आहे. मात्र, गणेशमूर्तींच्या दरवाढीचा जीएसटीशी काहीही संबंध नाही. जीएसटीच्या नावाखाली दरवाढ करून ग्राहकांची फसवणूक करू नये,’ असे जीएसटीच्या पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशमूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. त्याच वेळी जीएसटी लागू झाल्याने गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जीएसटीची झळ बाप्पांनाही बसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जीएसटीच्या पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर यांच्याकडून खरी परिस्तिथी जाणून घेतली.

मानकोसकर म्हणाले, ‘गणपती ही कलेची देवता आहे. जीएसटीमुळे गणेशमूर्तींची दरवाढ झाली असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे,’ असे मानकोसकर यांनी स्पष्ट केले. ‘मुळातच मातीवर जीएसटी लागू नाही. त्यातच रंगावर पूर्वी साडेबारा व साडेतेरा असा २६ टक्के कर होता. आता रंगावर १८ टक्के जीएसटी आहे. त्यामुळे रंग स्वस्त झाले आहेत. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसवरदेखील पूर्वी असलेल्या करांपेक्षा सध्या लागू असलेला जीएसटीचा दर कमीच आहे. त्यामुळे जीएसटी चा परिणाम गणेश मुर्तिवर होणार नाही, मात्र जीएसटी च्या नावाखाली विक्रेते दिशाभूल करू शकतात ये नाकारता येणार नाही. व्यावसायिक म्हणून दर वाढविण्याचा त्यांना अधिकारही आहे. मात्र, जीएसटीमुळे दरवाढ झाली आहे, असे म्हणणे अत्यंत चुकीचे व दिशाभूल करणारे आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

 

You might also like
Comments
Loading...