fbpx

‘अनैतिकता वाढल्यानेच मी राजकारणात आलो, मला खासदार म्हणण्यापेक्षा गुरूच म्हणा’

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केल्याने चर्चेत आलेले खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी आपला राजकारणात येण्याचा उद्देश सांगितला आहे. अनैतिकता वाढल्यानेच मी राजकारणात आलो आहे. मात्र, मी राजकारणी नाही. मला राष्ट्रसेवा करायची आहे. म्हणून मला खासदार म्हणण्यापेक्षा गुरूच म्हणा. त्यापेक्षा दुसरा आनंद नाही, असे आवाहन डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मुंबईत केले.

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्यावतीने मुंबईत दादर येथे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. मला केवळ राष्ट्रसेवा करायची आहे. देशातील विविध समाजाच्या प्रश्नावर मला काम करायचे आहे. त्यामुळे मी फक्त राष्ट्रसेवक आहे. म्हणूनच मी खासदार झालो आहे असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना स्वामी म्हणाले, ज्याप्रमाणे एका नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे धर्मदंड तर दुसरा राजदंड या दोन बाजू आहेत. धर्मदंड काढला तर अनैतिकता वाढेल. राजदंड काढला तर देशातील अराजकता वाढेल. त्यामुळे देश किंवा विश्व चालवण्यासाठी दोन्ही असणे आवश्यक आहे. यापूर्वी महात्मा बसवेश्वर यांनी राजकारण आणि धर्मकारण दोन्हीही योग्यरित्या करून एक आदर्श ठेवला. तोच माझ्यासमोर असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.