स्वाईन फ्ल्युबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता प्रतिबंधात्मक खबरदारी बाळगावी – श्वेता सिंघल

Do not be afraid regarding swine flu - Shweta Singhal

सातारा : बऱ्याच दिवसानंतर स्वाईन फ्ल्युने सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ही चिंतेची जरी बाब असली तरी लोकांनी घाबरुन न जाता स्वाईन फ्लूला प्रतिबंधक उपायाद्वारे रोखता येत असून वेळीच घेतलेल्या उपचाराने स्वाईन फ्ल्यू बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न स्वाईन फ्ल्युबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

स्वाईन फ्ल्यू (एच 1 एन 1) हा विषाणूमुळे होणार आजार असून याचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो. स्वाईन फ्ल्यू हा बरा होणारा आजार असल्याने लोकांनी घाबरुन न जाता शिंकताना-खोकताना रुमालाने तोंड झाकणे, हात सातत्याने साबण पाण्याने धुणे, भरपूर पाणी पिणे, पौष्टिक आहार घेणे, सार्वजनिक ठिकाणी न थुकणे, हस्तांदोलनाऐवजी पारंपारिक पध्दतीने नमस्कार करणे, गर्दी टाळणे, सौम्य ताप खोकला, घसा दुखणे, खवखवणे, अंगदुखी, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, उलट्या होणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी.

जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार आणि धोका उद्भवू नये शासकीय रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रमार्फत स्वाईनफ्ल्युचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयामार्फत प्रतिबंधात्मक उपचारासाठी पुरेशी औषधे व सुविधा करुन देण्यात आल्या आहेत. स्वाईन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा रुग्णालयाबरोबरच ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्लू संदर्भातील औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. खाजगी डॉक्टरांनीही स्वाईन फ्ल्युची लक्षणे असणारा रुग्ण आढळल्यास बाह्यरुग म्हणून तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांना खाजगी डॉक्टरांनी वेळेत उपचार व औषधे उपलब्ध द्यावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.