पंढरपुरात आंदोलन करू नका, मराठा-धनगर आरक्षणावर शासन सकारात्मक : मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा – आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेकरिता पंढरीत येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेपासून रोखण्याचे नियोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे त्यामुळे पंढरपूर येथे आंदोलन करु नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

विक्रमी संख्येचे 57 मोर्चे शांततेत काढल्यानंतरही राज्य सरकार आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेत नसल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आता आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जूनमध्ये तुळजापूर येथे जागर गोंधळ आंदोलन करून राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर आता पंढरपुरात आंदोलन करण्याचे नियोजन केले जात आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 22 जुलै रोजी पंढरपुरात येणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्र्याना शासकीय महापूजेपासून रोखण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागास वर्ग आयोगाच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. शासनातर्फे दोन टप्प्यांत ७२ हजार पदांची महाभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये १६ टक्के पदे मराठा आरक्षण मिळेपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून त्यानुसार केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल. त्यामुळे या दोन्ही बाबींवर पंढरपूर येथे आंदोलन करु नये. या ठिकाणी लाखो वारकरी भक्तीभावाने येतात. त्यामुळे आंदोलन करु नये, असे आवाहन त्यांनी निवेदनाद्वारे केले.

मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया होण्यापूर्वी शासनाने या समाजातील युवकांना शुल्क सवलत, उत्पन्न मर्यादा, वसतीगृहांची सोय असे अनेक निर्णय घेतले आहे. अल्पसंख्याक समाजाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की उच्च शिक्षणामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क सवलत दिली आहे. या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पंढरपूरमध्ये लाखो वारकरी भक्तीभावाने येतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी आंदोलन करु नये. तसेच झाल्यास हे आंदोलन लाखो वारकऱ्यांविरुद्धचे ठरेल, म्हणून पंढरपूर येथे आंदोलन करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘भीमा कोरेगाव’ हिंसाचाराला पोलीस जबाबदार; मराठा क्रांती मोर्चा

विठ्ठलाची पूजा करण्यापासून मुख्यमंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चा अडविणारLoading…
Loading...