ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंद मुक्कामी

टीम महाराष्ट्र देशा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा एक दिवसाच्या म्हणजेच अवघ्या वीस तासाच्या मुक्कामासाठी लोणंद नगरीत आज (शुक्रवारी ) येत असताना लोणंद नगरपंचायतीच्या वतीने पाणी, आरोग्य, वीज ,पालखी तळ आदींची कामे रात्रं दिवस युद्धपातळीवर करण्यात आली असून माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सोयी सुविधांची कामे वेगाने करण्यात आली आहेत. लोणंद नगरी माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाली असल्याची माहिती लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. स्नेहलता शेळके पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी दिली. माऊलींच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर लोणंद नगरपंचायतीची संपूर्ण यंत्रणा गेल्या दहा दिवसांंपासून रात्रं दिवस काम करीत आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी लोणंद नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती सौ. स्नेहलता शेळके- पाटील, लक्ष्मणराव शेळके, अभिषेक परदेशी व सर्व नगरसेवक यांनी दिली.

पालखी स्वागत तयारीची कामे सर्व नगरसेवक अॅड. बाळासाहेब बागवान, हणमंत शेळके, सचिन शेळके, योगेश क्षीरसागर, किरण पवार, दिपाली क्षीरसागर, कुसुम शिरतोडे, कृष्णाबाईरासकर, मेघा शेळके, लिलाबाई जाधव, राजेंद्र डोईफोडे, हेमलता कर्नवर, अॅड. पी बी हिंगमिरे, शैलजा खरात, स्वाती भंडलकर, विकास केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत. नगरपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा करणार्या पाडेगाव जॅकवेल, इंदिरानगर, वेअर हाऊस, दगड वस्ती बेलाचा मळा या ठिकाणच्या इलेक्ट्रोनिक्स मोटर्स, सर्व योजनेचे व्हाॅल्व दुरुस्त करण्यात आले असून चेंबर बांधकाम करण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक ती सामुग्री खरेदी करण्यात आली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी टी.सी.एल. साठा, तुरटी खरेदी करण्यात आली आहे.

नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या वतीने गावठाण अंतर्गत असलेली सर्व सार्वजनिक शौचालये दुरूस्ती केली आहेत. त्याचप्रमाणे गावठाणमधील सर्व गटारांची सफाई नियमितपणे केलीजात असून गटारालगतचे गवत काढण्यात येत आहे. पालखी काळात गटारावर डीडी टी पावडर टाकण्यासाठी पावडर साठा उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहे.स्वच्छतागृह सफाई करण्यासाठी फिनेल, डांबर, गोळ्या खरेदी करण्यात येत आहेत. वीज विभागाच्या वतीने गावठाण व वाडी वस्त्यावरील सर्व रोडलाईटसची दुरूस्ती करण्यात आली असून चौकाचौकात लावलेल्या फ्लडलाईटसची दुरुस्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छते अंतर्गत गावठाणमधील सर्व रस्त्याकडेची वेडी बाभळीची झाडे काढण्यात येत आहेत. खुल्या जागेतील स्वच्छता ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येत आहे. रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून भरण्यात येत आहेत. बाजार तळावरील पालखी तळावर स्वच्छता करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने पालखी तळावर मुरूम टाकून खड्डे मुजवण्यात येत असून त्यावर रोलरने सपाटीकरण केले गेले आहे तर पाऊस आल्यावर चिखल होऊ नये म्हणून दगडाची कच टाकण्यात आली आहे. पालखी तळावर तात्पुरती स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र दर्शन बारीसाठी लाकडी व लोखंडी बॅरीकेटस तयार केली आहेत. पालखी तळावर पुरेसा प्रकाश राहण्यासाठी कायमस्वरूपी व तात्पुरते विद्युत मनोरे उभारण्यात आले आहेत. पालखी तळावर चाळीस नळकोंडाळी उभे करून चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तळावरील सर्व कचरा एकत्र करून उचलून नेण्याची व्यवस्था दर वर्षाप्रमाणे करण्यात आली आहे. तळावर विद्यत रोषणाई करण्यात आली आहे.

पालखी तळावर मदत केंद्र, आरोग्य विभाग, पोलीस मदत केंद्र, अग्नी शामक सेवा या अत्यावश्यक बाबींचे नियोजन केले आहे. वारकर्यांना स्नान व कपडे धुण्यासाठी धोबी घाटाची उभारणी पालखी तळाच्या पश्चिमेस केली आहे.निर्मल वारी अंतर्गत गावात सुमारे सातशे शौचालये ठेवणार्या जागा सपाटीकरण, मुरूम टाकणे, लाईटची सोय केली आहे. संपूर्ण गाव, वाडी वस्तीवर जंतुनाशक फवारणीचे काम सुरू आहे. माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी झाली असून लोणंद नगरीत माऊलींचे आगमन झाल्यानंतर नगरपंचायतीच्या वतीने वाजत गाजत स्वागत करण्यात येणार आहे.

Loading...

माऊलींच्या स्वागताचे संपूर्ण नियोजन झाले असल्याचे स्नेहलता शेळके, लक्ष्मणराव शेळके, अभिषेक परदेशी यांनी सांगितले.कर्मचारी शंकरराव शेळके, रोहित निंबाळकर, बाळकृष्ण भिसे, विजय बनकर,पोपट क्षीरसागर, सदाशिव शेळके, प्रशांत नेवसे, नानासो शेळके आदींनी रात्रं दिवस नियोजन करून कामे केली आहेत.

 

Loading...