आदित्य ठाकरे ‘मातोश्री’वर नसल्याचा तो घेयचा फायदा, आता हातात पडल्या बेड्या

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्याभरात दौरा करत आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. यात्रेनिमित्ताने आदित्य मातोश्रीवर नसल्याचा फायदा घेत एका नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने त्यांच्या नावाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी कोणतीही वस्तू ऑनलाईन खरेदी केली नसताना देखील संबंधित डिलिव्हरी बॉय त्यांच्या नावाने पार्सल मातोश्रीवर देत होता. या पार्सलमध्ये कमी किंमतीच्या वस्तू पॅक करुन वस्तूंची मोठी रक्कम वसूल केली जात होती. आदित्य ठाकरे मातोश्रीवर नसल्याचा फायदा हा डिलिव्हरी बॉय उठवत होता. जवळपास चार वेळा अशाप्रकारे फसवणूक झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

चार वेळा फसवणूक करण्यात यशस्वी झाल्याने हा डिलिव्हरी बॉय पाचव्यांदा मातोश्रीच्या गेटवर पोहचला, यावेळी आदित्य ठाकरे घरी असल्याने त्यांच्या नावे पार्सल आल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली. मात्र आपण कोणतीही वस्तू ऑनलाईन खरेदी केली नसल्याचं त्यांनी सांगितले. त्यानंतर फसवणुकीचा सर्व प्रकार समोर आला आहे. धीरेन मोरे असं डिलिव्हरी बॉयचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.