औद्योगिक आस्थापनांच्या सीएसआर फंडाअंतर्गत जिल्ह्यास मिळाली ‘हि’ मदत!

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने नुकताच जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था (पुणे) आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टीट्युट (औरंगाबाद) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत लवकरच जिल्ह्यात २५ व्हेन्टिलेटर्स आणि ४५ ऑक्सिजन यंत्रणेची भर पडणार आहे.

तसेच औद्योगिक आस्थापनांकडून सामाजिक बांधिलकी म्हणून सीएसआर फंडाअंतर्गत मदतनिधी तसेच आवश्यक उपचार साहित्य देऊ केले जात आहे. या सहकार्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला मोठी मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे

जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना रुग्णांत सातत्याच्या कमालीची वाढ होत आहे. प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवित आहे. सोबतच औद्योगिक तसेच सामाजिक संस्थांना देखील जिल्हा प्रशासनाने सहकार्याचे आवाहन केले आहे. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच जिल्हा प्रशासनाकडे ब्रह्म ग्रुपने एक कोटीची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

यासोबतच आता जानकीदेवी बजाज संस्था (पुणे) आणि मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (औरंगाबाद)सोबतदेखील एक महत्वाचा सामंजस्य करार पूर्ण केला आहे. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टीट्युड यांनी कोरोना काळातील गांभीर्य समजून आपल्या सीएसआर फंडमधून जिल्हा प्रशासनाला एकूण २ कोटी १३ लाख रुपये किंमतीचे मेडिकल साहित्य देऊ केले आहे. यामध्ये २५ व्हेंटिलेटर, ४५ ऑक्सिजन सिस्टीम यांचा समावेश आहे.

यासंबंधीच्या सामांज्यस करारनाम्यावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जानकीदेवी ग्राम विकास संस्थेचे चेअरमन सी.पी.त्रिपाठी आणि मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नताशा वर्मा यांनी स्वाक्षरी केली आहे. हे साहित्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी वापरण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या