नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी जि. प. अध्यक्षा शालिनी विखेंना धाडली नोटीस

टीम महाराष्ट्र देशा : नगर जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची संधी न देताच त्यांचेविरुद्ध अविश्वास ठराव आणला असल्याचे सांगत नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे यांच्याकडे याबाबतचे स्पष्टीकरण मागितले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांनी नगर जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांचा भंग केला असून आदिवासी क्षेत्र असलेल्या पेसातील पद काही कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्त ठेवले आहेत, अशा तक्रारी होत्या. तसेच विकास निधी वेळेत खर्च न करता जिल्हा परिषदेचे नुकसान केले, असंही आरोप होता. याबाबत नगर जि. प. स्थायी समिती सभा, सर्वसाधारण सभा यात चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेने या महिन्यात विशेष सभा घेऊन माने यांचेवर अविश्वास ठराव आणला. मात्र आपण बदल्या नियमानुसार केल्याचे माने यांचे म्हणणे होते.

दरम्यान अविश्वास ठरावानंतर शासन शक्यतो सदर अधिकाऱ्याची बदली करून परत रुजू करतात . मात्र, या प्रकरणात नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी अध्यक्षा विखे यांनाच अविश्वास ठरावाचे स्पष्टीकरण मागितले आहे. प्रशासकीय व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही बाब संयुक्त नाही. त्यामुळे 2 ऑगस्टला विभागीय आयुक्तांसामोर म्हणणे मांडा असे विखे यांना कळविण्यात आले आहे.