पालघर : मच्छिमारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

पालघर : मच्छीमारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी दमण ते दातिवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील सुमारे ५ हजाराहून अधिक मच्छिमारांनी रस्त्यावर उतरत प्रशासना विरोधात एल्गार पुकारला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीवर सर्व मच्छिमार बहिष्कार टाकतील व आमरण उपोषण करतील असा इशारा देखील दिला आहे.

दमण ते दातीवरे मच्छिमार धंदा संरक्षण समिती च्या वतीने उत्तन,वसई,अर्नाळा,मढ, भागातील मच्छीमारांनी समुद्रात सागरी हद्दीत केलेले अतिक्रमण,अवैधरित्या पर्ससीन मासेमारीवर बंदी घालणे, मत्स्यव्यवसाय विभागा कडून देण्यात न आलेला डिझेल परतावा,जिल्ह्यातील मच्छीमारांच्या किनाऱ्या लगतच्या जमिनीचे सीमांकन करून सातबारे मिळावे,मासे विक्री करणाऱ्या महिलांना मार्केट व सुविधा मिळाव्यात आदी मागण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता शिवाजी चौकाकडे हजारो मच्छिमार,महिला एकत्र जमल्या होत्या.तेथून रेल्वे स्टेशन,हुतात्मा स्तंभ,ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेण्यात आला असून मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे याची भेट घेतली व मागण्यां बाबत चर्चा केली.

यावेळी मच्छिमार प्रतिनिधींची बैठक २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत .त्यात काही सकारात्मक तोडगा निघाला तर उत्तम नाहीतर जिल्हा दंडाधिकारी म्हणून मला असलेल्या अधिकाराचा कारवाईसाठी वापर मी करेन असेही जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.