आठ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी उदगीर नगरपालिकेचा वीज पुरवठा खंडीत !

उदगीर / प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजुरे- उदगीर नगरपालिकेकडे महावितरण कंपनीचे सव्वा आठ कोटी रुपये वीज देयकापोटी थकीत असल्याने महावितरण कंपनीने शुक्रवार रोजी नगरपालिकेच्या शहरातील पथदिव्यांचा आणि ६६ ठिकाणच्या पाणीपुरठ्याचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. शहरात पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
       उदगीर शहराचा वाढता विस्तार पाहता जिल्ह्यातील व सीमाभागातील महत्त्वाचे शहर आहे. येथील नगरपालिकेला  ‘ अ ‘ वर्गाचा दर्जा आहे. शहरातील नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या दिड लाखाच्या घरात आहे. अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या शहरातील नगरपालिकेचा वीज पुरवठा शुक्रवार ( दि. २१ ) पासून खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक ठिकाणी असलेल्या सर्व पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहरात अगोदरच चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून मागच्या वर्ष भरात शहरातील अनेक दुकाने , घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज पळवीला आहे. काही महिण्यापुर्वी शहरात राहणाऱ्या  एका पोलिस अधिकाऱ्याचे घर फोडून सर्व्हिस रिव्हाॕलवर व जिवंत काडतूसे अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना ताजी आहे. अशा सर्व बाजूंनी संवेदनशील असलेल्या शहरात पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
याबाबत महावितरणचे शहर अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंनद काटकर यांच्याकडून माहिती घेतली असता नगरपालिकेकडे एकूण सव्वा आठ कोटी रुपयांची महावितरणची थकबाकी येणे आहे. अनेक वर्षापासूनची ही थकबाकी असल्याने नगरपालिकेच्या शहरातील पथदिव्यांचा आणि शहरातील ६६ ठिकाणच्या पाणीपुरवठा करण्यात येणार असलेल्या बोअरचा , विहिरींचा वीज पुरवठा शुक्रवार रोजी खंडीत करण्यात आल्याचे काटकर यांनी सांगितले. तर याबाबत नगरपालिकेचे वीज पुरवठा विभागाचे अभियंता सुरेश ढवळे यांनी ही महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यानेच शहरातील पथदिवे बंद असल्याचे सांगितले. अतिशय संवेदनशील असलेल्या या शहरातील वीज पुरवठा महावितरणने वीज बिलाची थकबाकी न भरल्याने खंडीत केला आहे. परंतु शहरात  अंधाराचे साम्राज्य पसरल्याने वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण यामुळे नागरीकांतून भीती व्यक्त होत आहे.