हर्षवर्धन जाधवांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवा; शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद – शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांना उद्देशून निवडणुकीच्या जाहीर सभेत असभ्य शब्दप्रयोग करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालूक्यातील चिंचोली येथील जाहीर सभेत अतिशय खालच्या पातळीवर जाउन शिवसेना पक्षाला आणि पक्षप्रमुखांना उद्देशून सत्तार तुमच्या आईचा नवरा आहे काय’ असे उदगार काढून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून शिविगाळ केली व जातीय भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट निर्माण झाल्याने कन्नड विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होउ शकतो. जाधव यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांना अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ, सुनीता आउलवार, विश्वनाथ स्वामी, कला ओझा, सुनीता देव यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

महत्वाच्या बातम्या