पुण्यातील निर्बंधांमध्ये सूट मिळण्यावरून वाद; महापौरांनी आरोग्यमंत्री टोपेंना केला ‘हा’ सवाल

rajesh tope vs murlidhar mohol

पुणे : या वर्षाच्या मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात थैमान घातले होते. एप्रिल महिन्यात पुण्यातील स्थिती ही गंभीर बनली होती. दिवसाला सुमारे ७ ते ८ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद एकट्या पुणे शहरात केली गेली. यानंतर मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरू लागली. सध्या दररोज सरासरी २०० ते ४०० कोरोना रुग्णांची नोंद पुणे शहरात केली जात आहे.

कोरोना संसर्ग हा कायम असून हा रोग पूर्णपणे नष्ट होईपर्यंत संकट हे कायम आहे. दरम्यान, पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता मिळावी अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ, व्यापारी संघटना आणि इतर नेत्यांनी केली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात तिसऱ्या स्तराचे नियम कायम ठेवण्यात आले असून मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. आता यावरूनच भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, पुणेकरांचा वाढत रोशन लक्षात घेता आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्बंध हटवण्याबाबत अद्याप थेट भूमिका घेतली नसून राजेश टोपे यांनी भूमिका जाहीर केली आहे. ‘जर पुणे महापालिकेला सध्याच्या कडक नियमावलीमध्ये मुभा हवी असेल तर महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा,’ अशी भूमिका राजेश टोपे यांनी घेतली आहे.

यावर आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करत राजेश टोपे यांना थेट सवाल केला आहे. ‘पुण्यात निर्बंध शिथिल करायचे असतील तर प्रस्ताव पाठवा, असं आरोग्यमंत्री म्हणाले. मग प्रश्न हा पडतोय, असा प्रस्ताव मुंबईने आणि शिथीलता दिलेल्या इतर जिल्ह्यांनी दिला होता का?’ असा सवाल मोहोळ यांनी केला आहे. इतर जिल्ह्यांसह मुंबईने प्रस्ताव न देताच जर सूट मिळत असेल तर पुण्याबाबत असा दुजाभाव का ? असा सवाल देखील मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या