कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची आजची स्वतंत्र ध्वजाची आस उद्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी असू शकते:उद्धव

कर्नाटक सरकार बरखास्त करा :ठाकरे

वेबटीम : स्वतंत्र ध्वजाची कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्दारमय्या यांनी केलेली मागणी केंद्र सरकारनं धुडकावून लावल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामना मधून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची आजची स्वतंत्र ध्वजाची आस उद्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी असू शकते. काट्याचा नायटा होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही कीड चिरडून टाकली पाहिजे, असे सांगतानाच स्वंतत्र ध्वजाची मागणी करणे म्हणजे घटनाविरोधी कृत्य असून त्यामुळे केंद्र सरकारने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे सरकार बरखास्त करावे तसेच कर्नाटक सरकारला केंद्राकडून मिळणारी सर्व मदत तात्काळ बंद करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
यावेळी त्यांनी कर्नाटक काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. जम्मू-कश्मीरचा स्वतंत्र झेंडा आधीच हिंदुस्थानी घटनेच्या काळजात घुसला आहे. तो निघता निघत नाही. ती वेदना ठसठसत असतानाच कर्नाटकी काँग्रेसवाल्यांनी हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा विचार राष्ट्रद्रोहाचाच आहे, अशी सणसणीत टीकाही त्यांनी केली.

सोनियांनी हा विषारी फणा का ठेचला नाही?

कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी गृहमंत्री म्हणून देशातील सर्वच संस्थानांचे विलीनीकरण केले. या प्रत्येक संस्थानिकाचा त्याच्या राज्यात स्वतंत्र झेंडा होता. या सगळय़ांना देशाच्या एका झेंड्याखाली आणण्याचे कर्तव्य सरदार पटेलांनी बजावले, पण काँग्रेसच्याच विचारसरणीवर ‘टांग’ वर करण्याचे काम सिद्धरामय्यासारख्या विषारी माणसाने केले असेल तर सोनिया गांधी व त्यांच्या चिरंजीवांनी या विषारी सापाचा फणा अद्याप ठेचला कसा नाही?, असा सवाल करतानाच हैदराबादच्या निजामाने हिंदुस्थानात विलीन होण्यास नकार दिला व आपल्या स्वतंत्र राज्याचे निशाण फडकवण्याचे बंड केले तेव्हा सरदार पटेल यांनी निजामाच्या राज्यात सैन्य घुसवून त्याचे स्वतंत्र निशाण जाळून टाकले व तिरंगा फडकवला. सोनिया गांधी यांनी त्यांच्या कानडी निजामाचा राजीनामा घेऊन राष्ट्रीय बाणा दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले.