औरंगाबादमधील कचरा प्रश्नांवर चर्चासत्र

garbage-aurangabad

औरंगाबाद: निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा वापर करून प्रत्येक वॉर्डात कचऱ्यावर  प्रक्रिया करावी, अशी मागणी सोमवारी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एका चर्चासत्रात केली. स.भु. परिसरातील गोविंदभाई श्रॉफ सभागृहात सोमवारी सकाळी एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, माजी आ. प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, काशीनाथ कोकाटे, नगरसेविका कीर्ती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना कामगार नेते गौतम खरात म्हणाले, शहरात कचऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून यावर उपाय काढणे गरजेचे आहे.

शकुंतला देसरडा यांनी प्रथम आपले मनोगत व्यक्त केले. मागील काही वर्षांपासून त्यानी स्वत: गांडूळ खत निर्मिती केली आहे. व ५०० हून अधिक महिलांना या माध्यमातून रोजगार दिला आहे. शहरातील कोणताही एक वॉर्ड दत्तक द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ज्येष्ठ उद्योजक राम भोगले हे म्हणाले, शहरात ४०० मेट्रिक टन कचरा तयार होतो. शहरातील हॉटेल, केटरर्स यांनी स्वत: कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस तयार केला तर शहराच्या कचऱ्यावर होणारा ६० कोटींचा खर्च कमी होईल. तसेच लोकसहभागातून महापालिकेने काही प्रक्रिया करणाऱ्या मशीन उभाराव्यात. उर्वरित मशीन शहरातील सर्व उद्योजक देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कचरा अडवा कचरा जिरवा ही मोहीम राबविण्याचे आवाहन डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले. मनपा कर्मचारी, अधिकाऱ्यांना स्वत:चा कचरा घरातल्या घरातच जिरवा, अशी सक्ती करा, असे माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सांगितले. नगरसेविका शिंदे यांनी कचऱ्यावर  प्रक्रिया करण्यावर भर दिला. मागील १८ दिवसांमध्ये मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी  कचऱ्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या हे जनतेला माहिती आहे. आणीबाणीअंतर्गत मशीन खरेदीचा विचारही सुरूअसल्याचे महापौर घोडेले यांनी नमूद केले. माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत ,शहरासाठी काहीतरी चांगले काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.