राज्यसभेसाठी राणे, संचेती, शायना एनसी यांच्या नावाची चर्चा

rajysabha

टीम महाराष्ट्र देशा- पुढील महिन्यात होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेक नेते इच्छुक आहेत पण त्यासाठी उघडपणे कोणीही काहीही बोलताना दिसत नसल्याचे चित्र आहे.मोदी-शहा ठरवतील त्याच नेत्यांना संधी मिळणार हे भाजपमधील मंडळींना माहित असल्यामुळे भाजप नेत्यांनी हि भूमिका घेतली आहे. बाकी कोणाचं असो किंवा नसो प्रकाश जावडेकरांच राज्यसभेचे तिकीट कन्फर्म असल्याने जावडेकर बिनधास्त आहेत. तर दुसऱ्या बाजूला काल नारायण राणे यांनी भाजप अध्यक्षांची भेट घेतली. भाजपकडून राणेंना राज्यसभेची ऑफर असल्याचं बोललं जात आहे. राज्यसभेसाठी ज्या महाराष्ट्रातून जागा आहेत त्यासाठी चुरस वाढली आहे . नारायण राणे यांच्याशिवाय अजय संचेती किंवा शायना एनसी यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

एप्रिल-मे 2018 मध्ये राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. यामध्ये 16 राज्यांतील राज्यसभेच्या 58 जागा असून महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

महाराष्ट्रात रिक्त होत असलेल्या सहापैकी तीन जागांवर विजय मिळवणे भाजपला शक्य होणार आहे. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेल्या मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुदत संपत आहे. त्यामुळे मागील वेळी मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे ते गृहराज्य महाराष्ट्रातून पुढील सहा वर्षासाठी राज्यसभेत जाणे पसंत करतील. मोदींनी त्यांच्यावर मनुष्यबळ विकास सारख्या महत्त्वाच्या मंत्रालयावर वर्णी लावल्याने त्यांची जागा पक्की मानली जात आहे.

दरम्यान,बुधवारी सायंकाळी नारायण राणे हे देखील दिल्लीत दाखल झाले. रात्री उशिरा त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हेही यावेळी उपस्थित होते. नारायण राणे यांना राज्यात मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की राज्यसभेवर वर्णी लावायची याबाबत यावेळी चर्चा झाल्याचं समजतं.

सध्या भाजपकडे संचेती यांच्या रूपात एकच जागा होती. आता संख्याबळामुळे तीन खासदार निवडून पाठवणे भाजपला शक्य असल्याने इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच होणार आहे. उर्वरित दोन जागांसाठी अजय संचेती किंवा शायना एनसीसह मुंबईतून एखादे आर्थिक रसद पुरविणारे नाव पुढे येऊ शकते. पण गडकरींचे निकटवर्तीय अजय संचेतींना मोदी-शहा-फडणवीस हे त्रिकुट पुन्हा संधी देईल का याची चर्चा सुरू आहे.