मराठा विद्यार्थी-सरकारमधील चर्चा निष्फळ; विद्यार्थी आंदोलनावर ठामच

टीम महाराष्ट्र देशा:  वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन मिटण्याची शक्यता संपुष्टात आली आहे . मराठा विद्यार्थी आणि राज्य शासनातील चर्चा निष्फळ ठरल्यानं विद्यार्थी आणि त्यांचे नेते आंदोलनावर ठाम आहेत. विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पण विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नागपूर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात मराठा विध्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानात दाखल झाले.

यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी ‘आपण सरकारशी चर्चा करुन या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार’ असल्याचं आश्वासन दिले आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाच्या याचिकेबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दणका दिला होता. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली होती. त्यामुळे मराठा विधार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.